Wednesday, 10 March 2010

तू

तू असताना आयुष्याचा
अर्थ मी लावत गेलो
आधार तुझा गं मिळता
जणू वादळात मी तरलो,

होतीस तू माझी झालेली
मी तुझाच होऊनी गेलेलो
जाताच तू सोडून मला
मी माझाच न राहिलो,

मनात होती खंत तरीही
कायमच मी हसलो
हसता हसता मनात माझ्या
एकटाच मी रडलो,

फिकीर सारुनी दूर एकदा
बेदुन्धच मी झालो
पण तुझ्याविना मग कुणी दिसेना
जणू आंधळाच मी झालो.

प्रसन्न
२२/१०/२००८

Thursday, 4 February 2010

प्रेम

कितीही विचार केला तरी
प्रेम मला कळत नाही
मी, प्रेम आणि हृदय
याचा त्रिकोण काही जुळत नाही

प्रेम नक्की कसं असतं
एका कवीच्या कवितेसारखं
मूर्तिकाराच्या मूर्तीत ते असतं
का असतं चित्रकाराच्या रंगांसारखं

प्रेम करावं कोणावरही
त्याला कुठं हो बंधन असतं
बंधनात अडकून जे करतात
ते खरं प्रेमच नसतं

प्रेमात काहीही केलं तरी
म्हणतात सगळं माफ असतं
चुका, दुर्गुण जातात नजरेआड
म्हणूनच का प्रेम आंधळा असतं ?

माझ्यालेखी प्रेम म्हणजे
पिंपळाचं एक पान असतं
जितकं असतं जुनं अन् जपलेलं
सौंदर्य त्याचं जास्त असतं !!

प्रसन्न

जगावं तर कसं???

जगावं तर गुलाबासारखं
काट्यांमध्ये फुललेलं
स्वतः कोमेजून जाताना
प्रेमाचं प्रतीक बनलेलं

Wednesday, 3 February 2010

फुलपाखरू....

अनेक मुलं न विचार करता बाकीच्यांना पाहून काय करायचं ते ठरवतात. अश्या मुलांसाठी...  फुलपाखरू....

होतं एक रंगीत फुलपाखरू
जग जिंकायची दांडगी हौस
होता विचार पक्का, लक्ष्य अढळ
कोण म्हणणार त्याला नको जाऊस

केला त्यानं प्रयत्न अमाप
प्रचंड तयारी धडपड खूप
त्याचं आयुष्य होतं लोणी
ठरवलं त्यानं कढवायचं तूप

घेतली उंच भरारी आकाशात
ठरवलं की जायचं खूप दूर
पाहिलं इतर पक्षी उडताना
वाटलं आपणही जाऊ जरूर

वाटेत घडल्या गोष्टी अकस्मात
आला संकटांचा महापूर
पंख त्याचा अर्धा तुटला
झाला स्वप्नांचा चक्काचूर

पण प्रयत्न त्यानं चालू ठेवला
कारण ठरवलं होतं मनाशी
वाटेत वारा मी म्हणत होता
झुंज होती पावसाच्या पाण्याशी

ठरवलं त्यानं करायचा नाही विचार
जात रहायचं आयुष्य नेईल तिथं
पण तरीही एक विचार डोकावला मनात
करायचं होतं काय अन् जातोय कुठं?

दूरच्या त्या प्रवासात, संकटांशी झुंजताना
भेटला त्याला कावळा एक
म्हणाला, खरी ताकद विसरलास?
आहेत तुझ्याकडे रंग अनेक

विचारांती समजलं त्याला
आज उघडले आपले नेत्र
दिसली त्याला बाग, त्यातली फुलं
म्हणाला कर्तृत्वाचं हेच खरं क्षेत्र

कण्हत जगणं, तीळतीळ मरणं
झालं होतं त्याला जीवघेणं
स्वतःच्या जगात आल्यावर ते खुललं
केलं त्यानं आयुष्याचं सोनं

प्रसन्न
११/०३/२००६

Friday, 29 January 2010

एक चारोळी

पाकळ्या वाळल्यावर पडून जातात
काटे मात्र पडत नाहीत,
सुख, संपलं की लोक विसरतात
दुःख मात्र विसरत नाहीत...

Wednesday, 27 January 2010

तो

त्या दिवशी होता, तो बिचारा खूप गोंधळलेला
झाले होते आता दोन दिवस, त्यांच्या भांडणाला
ती त्याच्याशी बोलली नाही,
त्याच्याकडे पाहून हसली नाही,
कारण दोन दिवस ती त्याला भेटलीच नाही,
मनात त्याच्या होत होता प्रश्नांचा भडीमार
ती असं का वागतीये याचाच सतत विचार..

भांडणाला त्यांच्या विषय काहीच नव्हता
वाटलं त्याला, असंच का होतं, जेंव्हा तुम्ही प्रेमात पडता?
विचार त्याचा थांबला नाही,
प्रश्न त्याला सुटला नाही,
कारण जिच्याशी होतं बोलायचा ती बोललीच नाही,
नातं त्यांचं धोक्यात होतं हे त्याला काळात होतं
हृदय मात्र त्याचं, तिच्यामुळे जळत होतं..

भेटली कॉलेजमध्ये वाटलं त्याला लागेल आता बोलायला
पण त्या दिवशी वेळ नव्हतं तिच्याकडे, त्याच्यासाठी द्यायला
नातं त्यांचं तुटलं होतं,
प्रेम तिचं संपलं होतं,
कारण तिला आता त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं,
तीळतीळ तुटला तो, त्याचं मन लागलं गुदमरायला
पण ती होती तरीपण खुश, याचाच बर वाटलं त्याला..

होतं त्याचं त्याच्या सखीवर प्रेम जीवापाड
पण कळलं नाही त्याला काय आलं प्रेमाच्या आड
आता मनात सगळं त्यानं पुरलं होतं,
जे झालं ते मान्य केलं होतं,
पण नातं तुटण्याचे कारण अजून त्याला कळलं नव्हतं,
ठरवलं त्यानं रहायचं एकटं, रामराम ठोकला प्रेमाला
परत आता हे झेपणार नव्हतं त्याच्या नाजूक हृदयाला....

प्रसन्न
२०/०८/२००७

Tuesday, 26 January 2010

दारू

दारू

शनिवारी रात्री मित्रांबरोबर बसलो मी प्यायला
क्वार्टर नंतर हळू हळू दारू लागली बोलायला,
म्हणाली आजकाल मिळत नाहीत लोक मला न्याय द्यायला
प्रेमभंग झालेले वीरच, बसतात कधीतरी लावायला.

म्हणतात लोक झेपत नसेल, तर दारू नाही प्यायची
अहो न झेपल्यानंतरची मजा त्यांना काय कळायची,
पिऊन स्वतःची आणि इतरांची मजा पहायची
जिवलग मित्राला सुद्धा खटकन कानाखाली हाणायची.

माणूस होतो हरिश्चंद्राचा अवतार बोलू लागतो खरं
कधी आसू, कधी हासू, पण मनातून निघतं सारं
प्रेम नोकरी शिक्षण धंदा, कटकटी जातात पटकन दूर
त्या दारूत क्षणभर आपण विसतो, आपल्या स्वप्नाचा चक्काचूर

नंतर दारू तिची गाह्राणी लागली मला सांगायला
तिला समाज वाईट म्हणतो, हे पटला नव्हतं तिला
उरलेले २ पेग मी दिले तिला मारायला
ते मारून तिचं दुःख, लागली ती विसरायला.

प्रसन्न
१०/०८/२००७

Friday, 22 January 2010

माझ्या पहिल्या काही कवितांपैकी......

हरवलेला माणूस

देवा मला एक प्रश्न कायम पडतो
का माणूस भविष्याच्या चिंतेत पडतो.

भविष्याच्या विचारात
माणसांच्या जंगलात
माणूस कायम हरवलेला असतो
स्वतःच्या आयुष्यात

देवा मला एक प्रश्न कायम पडतो
का माणूस कोणाच्यातरी प्रेमात पडतो

कोणाच्यातरी प्रेमात
नाती सांभाळायच्या चक्रात
माणूस कायम हरवलेला असतो
स्वतःच्या आयुष्यात

देवा मला एक प्रश्न कायम पडतो
का माणूस स्वार्थासाठी इतरांशी नडतो

कोणाशीतरी नडण्यात
फुकटच्या भांडणात
माणूस कायम हरवलेला असतो
स्वतःच्या आयुष्यात

देवा मला आता विचारायचाय प्रश्न
हरवलेल्या या माणसाला
कशाचा आधार मिळतो याला
जगात समर्थपणे वावरायला ...

प्रसन्न
१५/०३/०६

Thursday, 21 January 2010

शब्द

शब्द

भाषातज्ञसुद्धा कायम नवीन शब्दाच्या शोधात असतो
कितीही शब्दकोडी सोडवली तरी नेमका शब्द सापडत नसतो,

बोलताना सखीबरोबर शब्द कधी आठवत नाहीत
मनात ठरवलेला असतं खूप, अक्षरच एकमेकांशी जुळत नाहीत
कारण हृदयाच्या दबावाखाली मेंदू काम करत नसतो
कितीही शब्दकोडी सोडवली तरी नेमका शब्द सापडत नसतो.

मोक्याच्या ठिकाणी असतात मनात अर्थ अनेक
पण शोधायचा असतो त्यासाठी शब्द एक
कारण अनेक अर्थ सांगूनही, भाव कधी पोचत नसतो
कितीही शब्दकोडी सोडवली तरी नेमका शब्द सापडत नसतो.

सुख दुःख बर वाईट, या पलीकडेही काही भावना असतात
लोक म्हणतात त्या सांगायला शब्दच नसतात
कारण मन जेव्हा भरून येत, प्रदर्शनालाही वाव नसतो
कितीही शब्दकोडी सोडवली तरी नेमका शब्द सापडत नसतो.

मैत्रीत आणि शत्रुत्वातही शब्द वापरायचे असतात जपून
बोलताना प्रत्येक, पडताळावा तावून सुलाखून
कारण एकदा टाकलेला चुकीचा शब्द परत कधी येत नसतो
कितीही शब्दकोडी सोडवली तरी नेमका शब्द सापडत नसतो.

प्रसन्न
१८/०८/०७